वीजपुरवठा

वीजपुरवठा

वाघोली परिसरातील नागरिकांना गेल्या काही काळात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, कमी व्होल्टेजने वीजपुरवठा, खराब ट्रान्सफॉर्मर, डी.पी. व रखडलेली स्ट्रीट लाईट कामे यांसारख्या समस्या जाणवत होत्या. या अडचणींमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते.

विशेषतः मदर मेरी सोसायटीमधील ट्रान्सफॉर्मर अचानक बंद पडल्याने संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला होता. नागरिकांनी तातडीने संपर्क साधल्यानंतर, मी स्वतः महावितरण अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधून पाठपुरावा केला. महावितरणच्या सहकार्याने त्या ठिकाणी नवीन 315 केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. या कामासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. मारुती विठोबा सातव यांचे विशेष आभार.

गणेश नगरमधील साईराज पार्क (1, 2, 3), समर्थ पार्क, आदर्श पार्क, इंकाई सोसायटी आणि गणराज पार्क या परिसरातही वारंवार वीजपुरवठा खंडित होणे व व्होल्टेज समस्या जाणवत होत्या. या सर्व बाबी लक्षात घेऊन महावितरणकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला. त्याचा परिणाम म्हणून या भागातही नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले, ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

तसेच, गुलमोहर पार्क सोसायटीमध्ये डी.पी. व स्ट्रीट लाईटच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त होते. या संदर्भातही महावितरण अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करून, पाठपुरावा केल्याने नवीन डी.पी. बसवण्यात आली. या सकारात्मक कामगिरीमुळे गुलमोहर पार्कमधील नागरिकांनी समाधान व्यक्त करत सन्मान देखील केला.

स्ट्रीट लाईटची कामे

वॉर्ड क्रमांक 6 मध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून यापूर्वी ड्रेनेज व रस्त्यांच्या समस्या प्रभावीपणे सोडवण्यात आल्या. त्याच धर्तीवर स्ट्रीट लाईटच्या कामांना गती देणे आवश्यक होते. या उद्देशाने वॉर्ड क्रमांक 6 मधील जवळपास सर्व प्रमुख ठिकाणी नव्या स्ट्रीट लाईट्स बसवण्यात आल्या, ज्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांचा सुरक्षित व सुलभ वावर शक्य झाला.

उपसरपंच पदावर कार्यरत असताना,  वाघोलीतील सर्व भागांत दर्जेदार स्ट्रीट लाईट बसवण्याचा विशेष प्रयत्न केला. त्यामध्ये एक महत्त्वाचे लक्षणीय काम म्हणजे वाघोली-केसनंद रोडवरील स्ट्रीट लाईट प्रकल्प. पुणे महानगरपालिकेच्या 2024-25 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात 60 लाख रुपये निधी मंजूर करून घेतला आणि या मार्गावर संपूर्ण स्ट्रीट लाईट सिस्टम यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आली.

याचबरोबर वाघोली-लोहगाव रोडवरील अंधाराचे साम्राज्य दूर करत हा संपूर्ण मार्ग अंधारमुक्त करण्यात आला. नागरिकांची सुरक्षितता आणि सुविधा लक्षात घेऊन हे काम अत्यंत कमी वेळेत पूर्ण करण्यात आले.

केवळ सरकारी मदतीवर अवलंबून न राहता, काही ठिकाणी  विशेषतः गुलमोहर सिटी आणि इतर भागांत  प्रशासनाची वाट न पाहता स्वतःच्या खर्चातूनही स्ट्रीट लाईट्स बसवण्यात आल्या. समाजहिताचा आणि नागरी सुरक्षेचा विचार करत या कामांमुळे अनेक भागात प्रकाशमान वातावरण निर्माण झाले.